धन्य तुझा दरबार बाबा धन्य तुझा दरबार ।।
धन्य तुझा दरबार बाबा धन्य तुझा दरबार ।।
दिंडी काढुनी पाय दमविती । नामघोषे शीण विसरती ।।
अन्नछत्रे मार्गी लाविती । भक्तीचा अचंबा फार ।।
बाबा धन्य तुझा दरबार ।। १।।
दीन गरीब लाचार । त्यांची रांग लांबच फार ।।
नाही तरी कुठे तक्रार । भक्ति वाहते अपरंपार ।।
बाबा धन्य तुझा दरबार ।।२।।
रांग लाविती तोडुनी जाती । धन दांडग्यां मध्ये घुसती ।।
घुसती आणि आपटूनी घेती । जमा डोई वरचा भार ।।
बाबा धन्य तुझा दरबार ।।३।।
जो बाबा बसला पारावरी । तो झाला संगमरवरी ।।
अंगावर झूल जरतारी । झटगमगाट झाला थोर ।।
बाबा धन्य तुझा दरबार ।।४।।
इथे भक्तीचे काम संपले । जगाच्या आठवणीत फिरले ।।
बाहेर शोधू लागले । दाखविण्या काही आधार ।।
बाबा धन्य तुझा दरबार ।।५।।
खिसे कापती वस्तू लुटती । गंडे दोरे ताईत विकती ।।
फसती त्यांसी फसवती । खुळचट आशेचा व्यवहार ।।
बाबा धन्य तुझा दरबार ।।६।।
सोंगे काढुनी उदी उधळती । दात विचकूनी भीक मागती ।।
बाबाचा अवतार म्हणवती । निव्वळ ढोंग आविष्कार ।।
बाबा धन्य तुझा दरबार ।।७।।
उमलत्या फुलांचा बाजार । चिमुकल्या मुलांचा बाजार ।।
लोटती तृतीयपंथीं लाचार । किती मोजावे व्यवहार ।।
बाबा धन्य तुझा दरबार ।।८।।
अर्धोन्मीलित कळ्यांचा व्यापार । उमलत्या मुलींचा व्यापार ।।
भक्तीला वासना शेजार । तरी हे तीर्थ क्षेत्र म्हणणार ।।
बाबा धन्य तुझा दरबार ।।९।।
चमत्कार म्हणुनी थोर । कर्तृत्व होई हद्दपार ।।
सर्व टाकुनी त्यावरी भार । निष्क्रिय शून्य विचार ।।
बाबा धन्य तुझा दरबार ।।१०।।
करितो गा विनवणी । नका ठेवू त्यास कोंडूनी ।।
राहू दे स्वहिताच्या मनी । करुणा अपरंपार ।।
बाबा धन्य तुझा दरबार ।।११।।
Nice. Hi apali rachana ahe ka?
ReplyDeleteYes. My wife was witness to what is stated in 8th stanza . Her report prompted me to compose it.
ReplyDelete