Wednesday, March 1, 2017

CALL OF THE MIND

न हाकारी
मन हाकारीसे मना । काय पुसतोसी जना ।।
तुझे तुलाच ठाऊक । तुझा व्यापार घाऊक ।।१।।
तुझी देवाण घेवाण । कधी कण कधीं मण ।।
काही उधार उसने । चुकवावे लागे देणे ।।२।।
रिण घेऊनिया आला । रिण देऊनिया गेला ।
कधी होणार मोकळा । सोडवुनी गुंतावळा ।।३।।
का बघे ना अंतरीं । करी का दिवाळखोरी ।।
इथे चाले ना नादारी । तुझी जप्ती कोण करो ? ।। ४।।
तुच तुला बुडवावे । नको काही नको हवे ।।
जेथे संपली उपाधी । तेथे लागली समाधी ।।५।।
भावार्थ
मनाचे दोन भाग कल्पिले आहेत . एक सांगणारा . दुसरा ऐकणारा . ऐकणारा भाग खूप जणांचे खूप काही ऐकत असतो. सांगणारा भाग क्वचितच बोलत असतो . तो एकदा बोलू लागला कि आपला आपणाशी संवाद सुरु होतो. संवादात सांगणे , ऐकणे , मनन करणे , प्रतिप्रश्न करणे, युक्तिवाद करणे , फिरून चिंतन करणे आणि मान्य करणे हे सर्व आले . जेंव्हा असा संवाद चालू होतो तेंव्हा बाहेर कोणाला काही विचारावे अशी गरज उरत नाही. आपल्या मनात चालणाऱ्या असंख्य गोष्टींची माहिती आपल्याला असतेच असते . ह्यालाच मनाचा घाऊक व्यापार म्हंटले आहे.
पुढील दोन कडव्यात व्यापाराच्या परिभाषेचा अवलंब करून मन हळु हळु स्वतःच्याच व्यापारात कसे गुंतत जाते ते सांगितले आहे. . वासनेचे ओझे घेऊन जन्माला यावे आणि मरावे लागते हे सुचित केले आहे. गुंतणे सोडवण्याची घाई केली आहे .
चौथ्या कडव्यात मनाला अंतर्मुख होऊन तुला कोणी बाहेरचा बुडवणारा नाही किंवा तारणारा नाही असे स्पष्ट केले आहे. इथे गुरूला नाकारणे अभिप्रेत नाही . " जो स्वयेंचि कष्टत गेला । तो नर भला रे भला " ( शिवानंदन केसरी ) , " गुरु की करनी गुरु ले जायेगा । चेलेकी करणी चेला ।। " ( कबीर ) आठवावेत .
शेवटच्या कडव्यात मनॊलयाचे महत्व प्रतिपादून रचनेची सांगता केली आहे.

No comments:

Post a Comment